|| श्री क्षेत्र मार्लेश्वर देवाचा जत्रा उत्सव ||

संक्रांतीला मार्लेश्वराच्या शिखरावर मोठी गजबज असते. कारण श्री मार्लेश्वर व साखरपा येथील गिरिजादेवीचा थाटात शुभविवाह म्हणजे कल्याणविधी संपन्न होतो. देवदेवतांचा हा विवाह सोहळा म्हणजे कोकणचा एक अनोखा ठेवा आहे. हा सोहळा गावक-यांचा अपूर्व उत्सव असतो. मार्लेश्वराच्या शिखरावर जाणा-या भक्तांमध्ये बिनधास्त वावरणारे साप आणि माकडेसुद्धा असतात.या देवांचे लग्न हा मानवासाठी उत्सुकतेचा विषय असतो. ही उत्सुकता प्रतिवर्षी भाविकांची प्रत्यक्ष विवाह सोहळा पाहून परिपूर्ण होत असते.

हिंदू धर्मातील लिंगायत शास्त्रानुसार सहय़ाद्रीचा कैलास म्हणजेच श्री मार्लेश्वर व साखरपा येथील गिरिजादेवी यांचा शुभविवाह (कल्याणविधी) मकरसंक्रांतदिनी थाटात केला जातो. देवदेवतांच्या विवाहाचे भक्तगण साक्षीदार ठरतात. या विवाहापूर्वी भाविकांची मोठी लगबगही पाहावयास मिळते. हळद लावणीपासून विवाहानंतरच्या साक्षी विडे भरणे असे धार्मिक कार्यक्रम विवाहाला जोडून पार पाडताना भक्तगण वेगळ्याच विश्वात रममाण होतात.

सहय़ाद्री पर्वतात दिमाखात बसलेल्या स्वयंभू श्रीदेव मार्लेश्वराची मोठी यात्रा प्रतिवर्षी विवाहाच्या आदल्या दिवशी मार्लेश्वर परीसरात भरते. यात्रा व विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहून विवाह सोहळ्याचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. ते अगदी पुढील वर्षाच्या विवाहापर्यंत. उत्सवाची सुरुवात आंगवली मंदिरातून करण्यात येऊन सांगतासुद्धा आंगवली मंदिरात होते. या उत्सवात आंगवली मंदिराचे स्थान फार महत्त्वाचे आहे, कारण देवाचा मूळ टोप या मठात असल्याने देवाच्या विवाहपूर्वीचे सर्व मंगलविधी येथेचे के ले जातात. म्हणजेच भोगीच्या दिवशी रात्री देवाला हळद लागते व घाणा भरला जातो. नवरा मुलगा छान सजविला जातो.

या उत्सवात आंगवलीच्या अणेरावांचा मान असून त्यापाठोपाठ जंगम, नाभीक, चांभार यांचाही मान असतो. शिवाय मारळचे अब्दागिरीवाले, बोंडय़े गावातील परिट, मुरादपूरचे भोई, कोळवणचे ताशेवाले, गोठणे गावातील करवल्या, मारळचे सावंत-मोकाशी, आंबवचे माने, भुजबळराव, आंगवलीचे कदम, नारकर, लाखण, मुरादपूरचे चोगले, बांडागळे यांचे महत्त्वाचे मानपान असतात.

देवरूखपासून १६ किमी अंतरावर असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावच्या निसर्गरम्य परिसरात धारेश्वर धबधब्याच्या साक्षीने श्रीदेव मार्लेश्वर आपले अढळ स्थानावर आरूढ आहेत. बारमाही वाहणारा धबधबा व आल्हाददायी वातावरण यामुळे येथे येणा-या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.

जाणकरांकडून सांगितल्या जाणा-या अख्यायिकेनुसार मार्लेश्वर रस्त्यालगत असलेल्या मुरादपूर गावात देवाचे मूळ वास्तव्य होते. तेथून देव आंगवली येथे आले. आंगवली येथे आल्यावर देवाने न्हावी व चांभार यांना साद घातली. त्याप्रमाणे न्हाव्याने देवाला वारा घातला तर चांभाराने उजेड दाखविला व त्याच प्रकाशात देव रात्रीच सहय़ाद्री कडय़ात जाऊन विसावला, जिथे आता तो आहे. १८व्या शतकात आंगवलीचे सरदार अणेराव (साळुंखे) शिकारीला गेले असता. पाण्याच्या शोधार्थ फिरताना या गुहेचा व देवाचा शोध लागला. तेव्हापासून गेली शेकडो वर्षे हा उत्सव अखंडपणे सुरू आहे.

विवाहाच्या आदल्या रात्री बरोबर १२ वाजता श्रीदेव मार्लेश्वर नटून थटून आंगवाली गावातून वाजंत्रीच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीने शिखराकडे धावत जातो. ते दृश्य विलोभनीय असते. त्या आधीच आंबव व लांजाची दिंडी देवरूखचा यजमान श्रीदेव व्याडेश्वर, वांझोळेगावची कावड व साखरप्याची नवरी मुलगी श्रीदेव गिरिजा व तिचे मानकरी शेटय़े व वऱ्हाडी मंडळी यांनी आपापल्या लव्याजम्यासह शिखराकडे प्रयाण केले जाते. कल्याणविधीच्या पहाटे नवरीला मागणी घालणे, बोलणी करणे, पसंती करणे, मानापानाचे विडे देणे इ. मंगलविधी होतात. आणि श्रीदेव मार्लेश्वराचा विवाह साखरप्याच्या श्रीदेवी गिरिजा हिच्याशी थाटात मान्यवरांच्या उपस्थितीत, ३६० मानक-यांच्या साक्षीने मंगलवाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत, सर्व मान्यवर स्वामींच्या मंत्रोपचाराने विधिवत मंगलाष्टके होऊन संपन्न होतो. या वेळी उपस्थित भाविक टाळय़ांचा कडकडाट करतात.

विवाहापूर्वी आंगवली मार्लेश्वर,साखरप्याची गिरीजा, देवरूखचा व्याडेश्वर, गोठण्याची करवली, लांजा वांझोळेची दिंडी, कावड*अशा सर्व पालख्या व दिंडय़ा वाजतगाजत मशालीच्या उजेडात शिखराकडे जातात. सोहळा व यात्रेच्या दोन दिवस व दोन रात्री मार्लेश्वरच्या खो-यात दिवाळीचे स्वरूप पाहावयास मिळते. हे सर्व दृश्य पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी भाविक खूप लांबलांबून आलेले असतात. कारण हे दृश्यच विहंगम असते. सर्व लहानथोरांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तगण जमलेले असतात. सोहळा पाहण्यासाठी लोक दाटीवाटीने डोंगर कपारीत बसलेले असतात. विवाहानंतर तिळगूळ वाटला जातो.

भक्तगण वधुवरांना आहेर करतात. लग्नाप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ भक्तगण घेतात. सर्व मंगलविधी पार पडल्यावर आलेल्या गावी भाविक परत जातात. शिखरावर रात्री वधूकडील मंडळी वराकडील वऱ्हाडींना मानाचे भोजन देतात. श्रीदेव मार्लेश्वराच्या श्रद्धेपोटी दरवर्षी लाखो भाविक मार्लेश्वराच्या खो-यात जमा होतात.

दुस-या दिवशी श्रीदेव मार्लेश्वर वाजतगाजत मारळ नगरीत येतो. मानपानाची घरे घेऊन तो पहाटे आंगवली गावात प्रवेश, करतो व दीड दिवसात कुठेही न थांबता रात्रंदिवस घरे घेऊन पूजाअर्चा घेऊन आंगवली मठात घरभरणी कार्यक्रम उत्साहात पार पडतो. आंगवली येथे मार्लेश्वर मंदिरात पालखी आल्यावर तिची चाक आंगवलीचे जंगम पुजारी काढतात आणि देव देवळात प्रवेश करतो. देवाची पालखी सभा मंडपात ठेवल्याबरोबर शेकडो भाविक देवासमोर साष्टांग दंडवत घालतात. ते पाहण्यासारखे असते. नंतर मानपानाचे विडे व नारळ दिले जातात.

शेवटी पालखीतून सर्व देव बाहेर काढून आंगवलीचे कदम (न्हावी) देवाला खोब-याचे दूध व हळद लावून गरम-थंड पाण्याने आंघोळ घालतात. देवरूखचे मठपती (पाटगाव) जंगम देवाची विधिवत पूजाअर्चा करतात. आरती होते व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होते. ती पुढच्या वर्षाची आस लागूनच. त्याच रात्री शिखरावर करंबेळीत आंगवलीचे कदम देवाची परडी सोडतात.

वर्षाचे बाराही महिने श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करून असतात. धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ करण्याचा आनंद प्रत्येक भाविक लुटतो. पावसाळय़ातील ४ महिने धबधबा रौद्ररूप धारण करत असल्याने भाविकांना या कालावधीत धबधब्याकडे जाण्यास मनाई असते. माकडे व सापांचे दर्शन भाविकांना येथे कायम घडते. देवांचा विवाह यात मार्लेश्वरच्या विवाह सोहळय़ाचे भक्तगण साक्षीदार ठरतात. हा सोहळा भक्तांच्या सदैव स्मरणात राहतो.